धुलीवंदनाची : कारणे, काळजी, स्वरूप

होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुलिवंदन किंवा धूळवड असे म्हटले तरी चालेल. या दिवशी सार्वजनिक सुट्टी तर असतेच पण साजरा करण्यासाठी लहान मुलांची सगळ्यात जास्त घाई असते

कारण या दिवशी ही लहान मुलं काही आपल्याला अजिबात ओळखायला येत नाहीत. वर पासून खालपर्यंत असे काही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलेले असतात की आपलं पोरगं कोणतं हेच ओळखायला येत नाही. हा झाला गमतीचा भाग.

धूलिवंदन का साजरी करतात

तर धुलीवंदन साजरा करणं म्हणजेच काय? ते आपण पाहू. म्हणजेच पाहूया धुलिवंदनची माहिती.

धुलिवन्दन चे शास्त्रीय कारण

होळी पेटवून झाल्यानंतरची जी राख असते ती एकमेकांना लावायची असते. म्हणजेच काय तर आपला देह हा पाच तत्त्वांनी बनलेला आहे. त्यामुळे धुलीवंदनाच्या दिवशी आपण पृथ्वीला म्हणजेच जमिनीला नमस्कार करावे आणि या पृथ्वीपासून सुरुवात करून ते उरलेल्या सर्व पंचमहाभूतांना देखील यात आदराने नमस्कार करावा.

तो दिवस म्हणजेच धुलिवंदन. या धुलिवंदना नंतर पंधरा दिवसांनी नवीन वर्ष सुरू होते. म्हणजेच पाडवा. त्या दिवशी आकाशाला भिडणारी अशी गुढी आपण उभारतो ती याच पाडव्या दिवशी.


धुलिवंदनच्या दिवशी घरातील स्त्रिया हंडे पाण्याने भरून होळी ज्या ठिकाणी पेटवलेली असते त्या जागी ठेवतात. सूर्याच्या प्रकाशात हे पाणी तापते आणि या पाण्याने मुलांना आंघोळ घालण्यात येते. असे म्हणतात की या पाण्याने अंघोळ केली की कोणालाही उन्हाळा बाधत नाही. तसेच या दिवसात कैऱ्यांचेही उत्पादन असते. त्यामुळे कैऱ्या उकडल्या जातात. त्याचा गर लहान मुलांच्या अंगाला लावतात आणि त्याने देखील स्नान घालतात.मोठी माणसे होळी वरती पाणी शिंपडून जी राख आहे. ती कपाळाला लावतात किंवा अंगाला फासतात. अगदी उटण्यासारखं आणि मग अंघोळ करतात.

धुलिवंदनाचे हल्लीचे स्वरूप

पण हल्ली याचं बदलत रूप म्हणजे रंगपंचमी. वेगवेगळे रंग आणून ते आपण एकमेकांना लावतो. काहीजण हे रंग पाण्यात मिसळतात आणि त्याचे पाणी पिचकारीतून किंवा बादली भरून एकमेकांच्या अंगावरती ओतले जाते. फुग्यांमध्ये पाणी भरून फुगे एकमेकांवरती मारले जातात.

तसेच काही ठिकाणी सुके रंग लावतात. काही ठिकाणी रंग ओले करून लावतात आणि त्यात अजून एक भर म्हणजे हल्ली त्या टीव्ही सिरीयल वाल्यांनी म्हणा किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमातून म्हणा सफेद कपडे या दिवशी घालायचे आणि ते उगीच आपले रंगीत करायचे ही देखील धुलीवंदन साजरी करण्याची एक नवीन पद्धत निघालेली आहे. तसेच वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम देखील या दिवशी ठेवले जातात.

काही ठिकाणी नृत्यकलाविष्कार असतात. तर काही ठिकाणी “रेन डान्स” ही नवीन संकल्पना सुरू झालेली आहे. जिथे वरून पाणी सोडले जाते आणि त्या पाण्याच्या शॉवर खाली लोकं डान्स करत असतात. नुसती एवढीच मजा मस्ती नसून वेगवेगळे खाण्याचे पदार्थ देखील या दिवशी उपलब्ध असतात. तर असा हा धुलिवंदनाचा दिवस किंवा धुळवड.


पण बदलत्या पद्धतीनुसार या धुलीवंदनाचे किंवा रंगपंचमीचे एक वेगळेच रूप आपल्याला हल्ली पाहायला मिळते. ज्यामध्ये फुग्यांचे मारे घातक ठरतात. रंग जे की कृत्रिम असतात. त्याने शरीराला इजा होते आणि एकमेकांना रंग फासण्याच्या नादामध्ये काही वेळेला समोरच्या व्यक्ती वरती जबरदस्ती केल्यासारखे वाटते. त्यात काही ठिकाणी तर रंग ऐवजी अंड किंवा गटारचे पाणी इत्यादी पदार्थांचे देखील सर्रास वापर होतो. त्यामुळे ही रंगपंचमी किंवा धुलीवंदन जीवघेणा विषय ठरू लागलेली आहे.

रंगापासून रक्षण कसे कराल? काय काळजी घ्याल?


अशावेळी शक्यतो आपण नैसर्गिक रंगाचा वापर करावा. जेणेकरून त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. तसेच रंगपंचमी किंवा धुलीवंदन खेळण्याच्या आधी संपूर्ण शरीराला अगदी केसाला सुद्धा तेल लावावे. जेणेकरून रंग काढताना जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. शक्यतो सुक्या रंगाने होळी खेळावी.

ओल्या रंगाने होळी खेळू नये. कारण मग ते रंग पक्के बसतात आणि निघायला बराच वेळ किंवा बरेच दिवस लागू शकतात. तोपर्यंत जर तुम्हाला रंगांची एलर्जी असेल तर ती देखील तुम्हाला सहन करावी लागू शकते. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक रंगाने होळी खेळा.साध्या गुलालाने जरी होळी खेळलात तरी चालेल. अगदी गुलालच नाही तरी हळदीने जरी होळी खेळलात तरी खूप चांगले. त्यामुळे धुलीवंदन किंवा धुळवडी ची मजा लुटताना सावध राहा आणि हा सण साजरा करा.

Exit mobile version